मोहोळ : मोहोळ-सोलापूर महामार्गावर सोमवारी (दि. २३) अवघ्या तासाभराच्या अंतराने मोहोळ जवळ दोन एसटी बसचे वेगवेगळे अपघात झाले. सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धाला धडक दिली, तर सोलापूरकडून मोहोळकडे येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. या दोन्ही अपघातांत चंद्रकांत कृष्णा बरडे ( रा. मानेगाव, ता. माढा) आणि शिवाजी आप्पा महापुरे ( रा. मार्डी ता. उत्तर सोलापूर ) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील महिला जखमी झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पहिला अपघात सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडवळ गावच्या हद्दीत घडला. फलटण- तुळजापूरकडे जाणारी एम .एच. २० /जी.सी.-३०४१ क्रमांकाची एसटी बस सोलापूरच्या दिशेने जात असताना चंद्रकांत बरडे यांना बसने जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.दुसरा अपघात सोमवारीच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चंद्र मौळी औद्योगिक वसाहतीजवळ घडला. एमएच १४ /बी.टी.-४८४१ क्रमांकाच्या तुळजापूर-मेढा एसटी बसने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शिवाजी आप्पा महापुरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी कल्पना महापुरे जखमी झाल्या. शिवाजी महापुरे यांना उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शिवाजी महापुरे यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी महिलेला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.या दोन्ही अपघातांप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अपघात पथकाचे पो.हे.कॉ. अतुल क्षीरसागर करीत आहे.
Views: 14