जेऊर – उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेला एआय डेटा सेंटर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा ठाम इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिला. या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त, मच्छीमार आणि नागरिकांचा तीव्र विरोध असून, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून व्यापारी वर्गाच्या हिताचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. या मागणीसाठी दि. २३ नोव्हेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की, उजनी धरणाची निर्मिती करताना शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त, मच्छीमार आणि वारकरी यांनी मोठा त्याग केला आहे. सोलापूर जिल्हा पिढ्यान्पिढ्या दुष्काळी म्हणून ओळखला जातो. धरणातील पाण्याचे नियोजनबद्ध वाटप होत असतानाही दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. अनेक गावांना पन्नास वर्षांनंतरही अपेक्षित पाणीपुरवठा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत पाणीसाठा मुबलक असलेल्या अन्य ठिकाणी प्रकल्प उभारण्याऐवजी उजनी परिसरातच प्रकल्प आणण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमचा विकासाला विरोध नाही; मात्र या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती, पर्यावरण, जंगल, जलचर आणि भविष्यातील पिढ्यांचे जीवन धोक्यात येणार असेल तर हा प्रकल्प आम्हाला मान्य नाही. स्थानिक नागरिकांचे हक्क आणि अधिकार डावलून सरकारने जबरदस्ती करू नये. देश संविधानानुसार चालतो, हुकूमशाही पद्धतीने नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे उजनीच्या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावर काय परिणाम होतील, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. शेतकरी आणि निसर्ग वाचला तरच देश समृद्ध राहील; अन्यथा उजनीचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही वाघमारे यांनी दिला. प्रकल्प रद्द न केल्यास तीन जिल्ह्यांत मोठा जनउद्रेक होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संतोष वारे, उजनी धरण समितीचे अविनाश सरडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती शिवाजी बंडगर, उदय देशमुख, तुकाराम घोंगडे यांनीही उजनी बचावासाठी सरकारला स्पष्ट इशारा दिला.
या आंदोलनावेळी ओबीसी तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, मुस्ताकीम पठाण, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघमोडे, तालुका सचिव जैन्नुदिन शेख, संभाजी शिंदे, प्रशांत उघडे, ईन्नुस शेख, अभि उघडे, शिवाजी शिंदे, भावना गांधी, कोमल लालबेग, सारिका कांबळे, हणमंत चांदणे, जनार्दन उबाळे, जय कांबळे, महेश चांदणे, करण आवटे, कपिल देडगे, दयाराम भोसले, मिलिंद भोसले, शहाजी डुकळे, निलेश चांदणे, नितीन आरणे, दादा आरणे, गोरख गायकवाड, विष्णू आखाडे, रामा पांडव, सचिन कांबळे, संतोष चव्हाण, शहाजी अवचर, इक्बाल शेख, हणमंत पवार आदींसह तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.