सोलापूर – जुन्या जन्म-मृत्यू नोंदींचे संगणकीकरण करून नागरिकांना अधिकृत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित गती मिळालेली नाही. ‘सीआरएस’ पोर्टलवरील ‘ॲड ओल्ड इव्हेंट’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या ८ हजार १२२ प्रस्तावांपैकी आतापर्यंत ४ हजार ६७६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच मंजुरीचे प्रमाण ५७.५७ टक्के असून, तब्बल ३ हजार ४४६ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जुन्या नोंदींच्या आधारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यातील या उपक्रमांतर्गत जन्म नोंदींचे ६ हजार ७०२, तर मृत्यू नोंदींचे १ हजार ४२० प्रस्ताव जिल्हा निबंधकांकडे मंजुरीसाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी जन्म नोंदींचे ४ हजार १०८ आणि मृत्यू नोंदींचे ५६८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्तावांवर कार्यवाही होणे बाकी आहे. २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंतची ही आकडेवारी आहे.
जुन्या अभिलेखांचे डिजिटायझेशन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ३० जून २०२६ रोजी परिपत्रक काढून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी नियम २००० नुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाने १ जानेवारी २०१६ रोजी जन्म-मृत्यू नोंदणीसाठी सीआरएस पोर्टल सुरू केले. त्यानंतर २४ जून २०२४ रोजी क्यूआर कोडसह सुधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र, यापूर्वीच्या जुन्या नोंदीही डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘ॲड ओल्ड इव्हेंट’ ही प्रक्रिया राबविली जात आहे.
या प्रक्रियेत आधार ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. एका नोंदीच्या मंजुरीसाठी साधारणतः ८ ते १० मिनिटे लागतात. जिल्हास्तरावरून ९० दिवसांच्या आत मंजुरी देण्याची तरतूद असून, जिल्हा आरोग्य अधिकारी ई-स्वाक्षरीद्वारे ऑनलाइन मान्यता देतात.
मात्र, प्रस्ताव मंजुरीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि मूळ नोंदवहीतील माहिती यांची अचूकता महत्त्वाची आहे. जन्म नोंदीसाठी मूळ जन्म नोंदवही, जुने प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे. तर मृत्यू नोंदीसाठी मूळ मृत्यू नोंदवही, जुने प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या कागदपत्रांची नातेवाइकांनी साक्षांकित केलेली प्रत आणि पत्त्याचा पुरावा जोडावा लागतो.
ऑनलाइन अर्जातील माहिती आणि मूळ नोंदवहीतील तपशीलात तफावत असल्यास किंवा कागदपत्रांमध्ये खाडाखोड आढळल्यास प्रस्ताव रद्द होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि माहितीची अचूकता तपासणे गरजेचे आहे. दुसरीकडे, प्रलंबित असलेल्या ३ हजार ४४६ प्रस्तावांचा निपटारा करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
चौकट
प्रस्तावांची सद्यस्थिती
२२ नोव्हेंबर २०२६ अखेर
तपशील जन्म मृत्यू एकूण
दाखल प्रस्ताव ६,७०२ १,४२० ८,१२२
मंजूर प्रस्ताव ४,१०८ ५६८ ४,६७६
प्रलंबित प्रस्ताव — — ३,४४६
चौकट
प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
जन्म प्रमाणपत्रासाठी
मूळ जन्म नोंदवही (नमुना क्रमांक १ किंवा रजिस्टर नमुना क्रमांक ७).
जुने जन्म प्रमाणपत्र.
स्वयं-साक्षांकित ओळखपत्र.
पत्त्याचा पुरावा.
मृत्यू प्रमाणपत्रासाठी
मूळ मृत्यू नोंदवही (नमुना क्रमांक २ किंवा रजिस्टर नमुना क्रमांक ८).
जुने मृत्यू प्रमाणपत्र.
नातेवाइकांनी साक्षांकित केलेली मृत व्यक्तीच्या कागदपत्रांची प्रत.
पत्त्याचा पुरावा.