अकलूज – काहीजण आम्हाला तालुका वाईज मतदान कळणार असल्याचे सांगत भीती दाखवण्याचे काम करत असून आपण केलेले मतदान कोणालाही समजत नसते त्यामुळे न घाबरता मतदान करावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात शिवरत्न येथे आयोजित पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले, समाज माध्यमातून व वर्तमानपत्रातून काहीजण तालुकावाईज मतदान कळणार असल्याचे सांगत भीती दाखवण्याचे काम करत असल्याचे सांगत त्यांनी लातूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकालाची प्रत दाखवत सोसायटी मतदारसंघ सोडून इतर सर्व मतदारसंघाचे पूर्ण संपूर्ण जिल्ह्याचे मतदान मोजले जात असल्याचे सांगितले. आणि त्यांना जर मतदान समजत असेल तर याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घ्यावी अशा मागणीचा अर्ज पुराव्यानिशी त्यांच्याकडे केला असून त्याचे अद्याप उत्तर आले नसल्याचे सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील सहकार सर्वांना सोबत घेऊन वाढविला अशा ज्येष्ठांना बोलावून घेऊन आम्हाला तालुक्यातील मतदान समजत असून त्यात काय झाले तर याद राखा अशा प्रकारची धमकी काल पुन्हा एकदा दिली असल्याचे समजले असून कोणीतरी बाहेरील व्यक्ती जिल्ह्यातील ज्येष्ठांना दम देत असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे त्यांचा स्वाभिमान जपण्याचा वाढवण्याचा प्रयत्न करत असून स्वाभिमानी शेतकरी सहकारी पॅनल सर्व उमेदवार सुशिक्षित व अनुभवी असल्याचे सांगत यातील एका उमेदवाराच्या भावाला पाच कोटी दंडाची नोटीस काढत दबाव आणल्याचेही त्यांनी सांगितले.
250 कोटीच्या कर्जाबाबत राजन पाटील यांनी केलेल्या अरोपांबाबत विचारले असता माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी राजन पाटील हे ज्येष्ठ व सहकारातील जानते व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात कुणाचेही नाव अथवा कार्यकाळ सांगितला नाही त्यामुळे नवीन संचालक मंडळ तयार झाल्यानंतर त्यांनाच विचारून त्यावर खोलात गेले पाहिजे असे मत व्यक्त केले.
Views: 6