सोलापूर : जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकवून खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट करत सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळासाहेब लक्ष्मण शिंदे (रा. कुसुर)आणि अल्लाउद्दीन चंदुलाल मुल्ला(रा तेलगाव) या दोघांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. कटारिया यांनी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला.
फिर्यादी अशोक रेवप्पा सावंत यांनी २०१४ मध्ये तक्रार दाखल करून आरोपींनी पहिल्यांदा ३,००० रुपये आणि दुसऱ्यांदा ६,००० रुपये लाच मागितल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनुसार लाच प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १२ आणि १३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले.
खरेदीखतानुसार ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया आधीच पूर्ण झालेली असताना, केवळ जुन्या जमीन वादातून आरोपींवर अवाजवी दबाव आणण्यासाठी आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी हा कट रचण्यात आला, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडला. साक्षीदारांची साक्ष, सादर पुरावे आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने बाळासाहेब लक्ष्मण शिंदे (रा. कुसूर) आणि अल्लाउद्दीन चंदुलाल मुल्ला (रा. तेलगाव) यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. एस. आर. पाटील, ॲड. व्ही. डी. चिनगुंडे आणि ॲड.सुप्रिया व्ही. चिनगुंडे यांनी काम पाहिले.





















