बार्शी – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले अमृत रोहिदास खेडकर यांनी गोवा येथे रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली प्रतिष्ठेची आयर्नमॅन ७०.३ गोवा ही आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा दुसऱ्यांदा यशस्वीरीत्या पूर्ण करुन बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेमध्ये सलग तीन आव्हानात्मक प्रकार पूर्ण करावे लागतात. त्यामध्ये १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे अशा एकूण ११३ किलोमीटर अंतराचा समावेश आहे.
शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, प्रचंड मेहनत, शिस्त आणि वेळेचे नियोजन यांची कसोटी पाहणारी ही स्पर्धा पूर्ण करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अमृत खेडकर यांनी दुसऱ्यांदा ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करुन आपली जिद्द आणि खेळाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
विशेष म्हणजे, पोलीस दलातील जबाबदारी सांभाळत त्यांनी व्यायाम, धावणे, सायकलिंग आणि पोहण्याचा नियमित सराव सुरु ठेवला आहे. यापूर्वीही त्यांनी मॅरेथॉन, विविध सायकलिंग स्पर्धा, बीआरएम आणि काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेत यशस्वी सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या या यशामुळे बार्शी, सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि बार्शी रनर्स व बार्शी सायकलिंग क्लबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी, क्रीडाप्रेमी, बार्शी रनर्स, बार्शी सायकलिंग क्लब तसेच मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Views: 10