अक्कलकोट – पोलीस दलातील जबाबदारीची सेवा सांभाळत शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन करण्याची किमया अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे सुपुत्र प्रा. धरेप्पा चंदप्पा संगोळगी यांनी साधली आहे. कर्नाटक राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (के-सेट २०२६) समाजशास्त्र विषयातून उत्तीर्ण होत त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याचा परिचय दिला आहे.
प्रा. संगोळगी हे सध्या कर्नाटक पोलीस दलात बेंगळुरू येथे कार्यरत आहेत. पोलीस सेवेतील व्यस्त आणि जबाबदारीच्या दिनक्रमातून वेळ काढत त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या मान्यतेअंतर्गत कर्नाटक परीक्षा प्राधिकरणामार्फत (केईए) ११ ऑक्टोबर २०२६ रोजी के-सेट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २० नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये प्रा. धरेप्पा सांगोळगी यांनी समाजशास्त्र विषयात यश मिळविले.
प्रा. संगोळगी यांना विश्व विक्रमवीर डॉ. धानय्या जी. कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या या यशाला मोलाची दिशा मिळाली. नोकरीची जबाबदारी आणि शैक्षणिक ध्येय यांचा समतोल साधत त्यांनी मिळविलेले यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
पोलीस सेवेबरोबरच ज्ञानसाधनेची आवड जोपासत उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणाऱ्या प्रा. संगोळगी यांनी ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. परिस्थिती कोणतीही असो, ध्येय निश्चित असेल आणि त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश निश्चित मिळू शकते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल तोळणूर ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.