सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी साहित्य व औजार मागणी योजनेसाठी अर्ज सादर करण्यास १० डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि कोणीही वंचित राहू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी दिली आहे. पूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली होती.
जिल्हा परिषद सेस (DBT) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेतीउपयोगी यंत्रसामग्री आणि कृषी औजारे ५० टक्के किंवा मर्यादित अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याकरिता संबंधित पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज मागविण्यात येत आहेत.
चौकट
या औवजारासाठी मुदतवाढ
पीक संरक्षण औजारे/उपकरणे: पिस्टन स्प्रेपंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप.
कृषी अभियांत्रिकी योजना: रोटाव्हेटर, पल्टीनांगर, पेरणीयंत्र.
कृषी सिंचन सुधारित औजारे: ५ / ७.५ एचपी सबमर्सिबल विद्युत पंपसंच, डिझेल इंजिन.
सुधारित औजारे व साहित्य पुरवठा: कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर
चौकट
अर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक
सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, तसेच लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र किंवा अपंगत्वाचा दाखला या कागदपत्रांसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज सादर करावा.
Views: 12