सोलापूर : श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री दिगंबर जैन गुरुकुल परिवाराच्या संयुक्त विद्यमाने श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेच्या गुरुकुल प्रशालेत आयोजित २०व्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १४५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
गुरुकुल प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका झोन क्रमांक १चे अधिकारी तथा प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रकाश दिवाणजी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाले. प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक व विद्यार्थ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकत्रित योगदान दिले. विद्यार्थ्यांनी पालकांना रक्तदानासाठी प्रेरित करून जनजागृती चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.
एच.डी.एफ.सी. बँकेचे सोलापूर व धाराशिव क्लस्टर हेड विनायक कुलकर्णी यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या सहभागातून शिबिर यशस्वी होणे प्रेरणादायी असल्याचे सांगितले, तर उद्घाटक प्रकाश दिवाणजी यांनी विद्यार्थ्यांच्या रक्तदान जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. एच.डी.एफ.सी. बँक व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदान प्रक्रियेत रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद वैद्य यांनी सहकार्य केले.
जनजागृतीसाठी स्काऊट व आर.एस.पी. विद्यार्थ्यांनी रॅली काढून रक्तदानाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवंदना, घोषवाक्य फलक, चित्रप्रदर्शन आणि कलाशिक्षक अरविंद गोटीमुकूल यांनी तयार केलेला आकर्षक सेल्फी पॉईंट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
सहशिक्षक मिलिंद खोबरे यांनी प्रास्ताविक केले. विकास शिळ्ळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन मेहता, बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे, पालक शिक्षक संघाच्या प्रतिष्ठा दोशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या कोमल बनसोडे, राष्ट्रीय खेळाडू मिलिंद गोरटे, माजी विद्यार्थी मल्लिनाथ आळंगे, वृशाली जतकर, राजू कुलकर्णी, सुनील हरहरे आदी उपस्थित होते.























