धाराशिव : राज्यासह विशेषतः धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल ३ कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे.
या रकमेचा धनादेश आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार तथा मंदिर प्रशासन विभागाच्या व्यवस्थापक माया माने आणि सहकारी राहुल पाटील सास्तुरकर उपस्थित होते.
आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले होते. त्यानंतर यंदा दुष्काळाच्या संकटात मदतीचा हात पुढे करत तीन कोटी रुपयांचे योगदान देऊन संस्थानने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव पुन्हा अधोरेखित केली आहे.
आई तुळजाभवानीच्या चरणी भाविकांकडून अर्पण होणाऱ्या श्रद्धेचे रूपांतर गरजू आणि संकटग्रस्तांच्या मदतीत होत असल्याने मंदिर संस्थानच्या या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेले हे योगदान संकटाच्या काळात अनेकांना आधार देणारे ठरणार आहे.