सोलापूर – जिल्ह्यातील खाजगी अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर) रोजी संविधान दिनी दुपारी १२ वाजल्यापासून पूनम गेटसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात दहा महिला शिक्षिकांसह एकूण २५ अतिरिक्त प्राथमिक शिक्षक सहभागी झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील खाजगी अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यातच चालू नोव्हेंबर महिन्यापासून या सर्व अतिरिक्त शिक्षकांचे वेतनही थांबवण्यात आले आहे. परिणामी, या शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असून त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक व कौटुंबिक संकट उभे राहिले आहे.
कोट
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित शिक्षकांची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती तसेच उपोषणकर्त्यांच्या आरोग्याचा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करावा. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी व उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी आणि समायोजनाचे आदेश निर्गमित करावेत. तसेच, आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी केली आहे.
चौकट
उपोषणात सहभागी असलेले शिक्षक
या आमरण उपोषणामध्ये गुरुनाथ हत्तरसग, गोपाळ पाटील, विजयकुमार म्हमाणे, महादेव म्हेत्रे, सूर्यकांत भतगुणकी, प्रकाश बडूरे, सुग्रीव गायकवाड, प्रशांत यादव, महादेव जकुणे, वैशाली पवार, भाग्यश्री कवठेकर, धानम्मा स्वामी, सारिका पोळ, ज्योती राऊत, शुभांगी गटकळ, विकास कोंढारे, रघुनाथ ताकभाते, नीलम माळी, मनीषा मेटे, सरिता हाके, संगमेश्वर खुणे, स्वाती म्याकल, जयंतकुमार गायकवाड, विश्वनाथ बिराजदार, अविनाश धनवेपाटील, प्रसाद साळुंखे, पद्मसिंह व्हरडे आणि बिबीतबस्सुम पटेल आदी शिक्षक सहभागी झाले आहेत.