सोलापूर – जिल्ह्यात दुष्काळ आणि संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजनांच्या हालचालींना वेग दिला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पाणीटंचाईची सद्यस्थिती, दुष्काळी परिस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर कोणत्या उपाययोजना निश्चित होतात, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा नियोजन भवन, सात रस्ता, सोलापूर येथे सकाळी १०.३० वाजता ही बैठक होणार आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत संबंधित विभागांकडून टंचाई परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत. बैठकीसाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागाची माहिती आणि सादरीकरण तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पानांचे क्रमांक व बाइंडिंग न करता रंगीत प्रतींचे पाच संच आणि सॉफ्ट कॉपी सादर करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, या बैठकीसाठी कोणत्याही विभागाने प्रतिनिधी पाठवू नये, तर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या विभागाची सविस्तर माहिती सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीसाठी आवश्यक पदनामाच्या पाट्या, नियोजन तसेच एनआयसीच्या माध्यमातून तांत्रिक सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची जबाबदारीही प्रशासनाने संबंधित यंत्रणांवर सोपवली आहे.
चौकट
पाणीटंचाईवर तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा
जिल्ह्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आवश्यक टँकर व्यवस्था आणि इतर टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. केवळ परिस्थितीचा आढावा न घेता प्रत्यक्ष उपाययोजनांचे नियोजन आणि विभागनिहाय जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.