सोलापूर – ऊसदराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष अद्याप कायम आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सुचवलेल्या प्रतिटन ३ हजार ४५० रुपयांच्या दराच्या प्रस्तावाला जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांनी संमती दिलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ८ टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा (रिकव्हरी) असल्याचे कारण पुढे करत जिल्ह्यातील १० ते १२ कारखानदारांनी बुधवारी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे आंदोलक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली.
कारखानदारांच्या या भूमिकेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या दराच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कारखानदारांनी ३ हजार १५० रुपयांपेक्षा अधिक पहिली उचल देण्यास नकार दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारच्या आदेशात प्रतिटन ३ हजार ४५० रुपयांचा तोडगा सुचवला. मात्र, या प्रस्तावाची अंमलबजावणी सर्व कारखान्यांकडून होत नसल्याने ऊसदराचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत सुमारे १२ कारखान्यांनी ३ हजार ४५० रुपये दर देण्यास संमती दर्शवली आहे. उर्वरित कारखानदार मात्र अद्याप प्रतीक्षेच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जाहीर झालेला दर प्रत्यक्षात मिळणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
उत्तर सोलापूरमध्ये सोशल मीडियावर चर्चांना उधाण
उत्तर सोलापूर तालुक्यात ऊसदराच्या प्रश्नावर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेला दर आणि प्रत्यक्ष कारखान्यांकडून मिळणारी पहिली उचल यामध्ये तफावत असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. काही शेतकरी कारखानदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काहीजण ऊस गाळपासाठी कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने चिंतेत आहेत.
दुष्काळी परिस्थिती, वाढलेला उत्पादन खर्च, मजुरी, खतांचे दर आणि सिंचनासाठी झालेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच बिघडले आहे. अशा परिस्थितीत जाहीर झालेला दरही वेळेत मिळत नसेल, तर शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न केवळ कारखानदार आणि संघटनांमधील संघर्ष न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न बनत आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होण्याची शक्यता
ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर गाळपासाठी जावा आणि त्यांचे नुकसान टळावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
आंदोलनाच्या दिवशी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिवसभर तसेच मध्यरात्रीपर्यंत कारखानदार आणि आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रस्तावित दरावर सर्व कारखानदारांची सहमती न झाल्याने प्रशासनासमोर पुन्हा मध्यस्थीचे आव्हान उभे राहिले आहे.
ऊसदराच्या प्रश्नावर आता प्रशासन, कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील पुढील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाहीर झालेला दर प्रत्यक्षात मिळणार की ऊसदराचा संघर्ष आणखी तीव्र होणार, हे आगामी निर्णयावर अवलंबून आहे.
चौकट
शेतकऱ्यांनी चिंता करू नये : विजय रणदिवे
उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील शेतकऱ्यांना कर्नाटकात प्रतिटन ३ हजार ६०० रुपये, तर माढा आणि करमाळ्यातील शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्यात ३ हजार ९०० रुपये पहिली उचल मिळत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केला.
ते म्हणाले, “इतर भागांत शेतकऱ्यांना अधिक दर मिळत असताना सोलापूरचे कारखानदार ३ हजार ४५० रुपये देण्यास का तयार नाहीत? रिकव्हरीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यांनी ३ हजार ४५० रुपये दर देणाऱ्या कारखान्यांनाच ऊस द्यावा. डिसेंबरपर्यंत शेतात ऊसाचे एकही कांडके शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ऊस वाळून जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी चिंता करू नये.”