अमूल दूधाच्या दरात वाढ करण्यात आली असून ग्राहकांना आता एक लिटरमागे प्रत्येकी 2 रुपये मोजावे लागणार आहेत. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने हा दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. आज सोमवारपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. अमूल दूधाच्या दरातील वाढ संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे.
अमूल दूध आता नवीन किमतींनुसार अमूल गोल्ड अर्धा लिटर आता 32 वरून 33 रुपये, अमूल ताजा 500 मिलीची किंमत 26 वरून 27 रुपये, मूल शक्ती 500 मिली आता 29 वरून 30 रूपये इतकी झाली आहे. एक लिटर दुधासाठी लोकांना आता 66 रुपये द्यावे लागणार आहेत. जे निवडणुकीआधी 64 रुपये होते. दुधाच्या या वाढलेल्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. याचाच अर्थ आता महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती या अमूलच्या तिन्ही दूधात दरवाढ करण्यात आली आहे. या तिन्ही कंपन्यांच्या दूधाच्या किमतीमध्ये भाववाढ झाली आहे. मात्र, अमूल ताजाच्या छोट्या पिशव्यांच्या किमतीमध्ये कोणतीही अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत. छोट्या पिशव्यांमधील दूध आहे त्या किमतीमध्येच मिळणार असल्याची माहिती मिळतेय.
गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने शेवटची दरवाढ ही फेब्रुवारी 2023 मध्ये केली होती. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी वाढलेला खर्च भरून निघावा यासाठी ही वाढ करण्यात आली असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.