माळशिरस : आषाढी वारीचे औचित्य साधत विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलमध्ये ‘आनंदवारी’चा भक्तिमय, संस्कारमय आणि सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पांडुरंगाच्या पालखीच्या पूजनाने झाली. विष्णुपंत कुलकर्णी विज्ञान, वाणिज्य व समीर गांधी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गेजगे सर तसेच विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. इनामदार मॅडम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
यावेळी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी संत चोखामेळा महाराजांचा “अबीर गुलाल उधळीत रंग” हा अभंग अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच सौ. राजमाने मॅडम यांनी भक्त पुंडलिकाची प्रेरणादायी कथा सांगत भक्ती, सेवा आणि मातृ-पितृभक्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
वारीच्या निमित्ताने संपूर्ण शाळा पंढरपूरच्या वारीच्या भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाली होती. रिंगण सोहळ्याने वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठल-रुक्मिणीचे झेंडे, टाळ, मृदुंग, वीणा आणि भगव्या पताका हातात घेत “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बालचिमुकल्यांनी पालखी खांद्यावर घेत टाळांच्या गजरात आणि अभंगांच्या सुरावटीत वारीचा आनंद लुटला.
Post Views: 9