आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर राज ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात जात असताना माजी मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र राज ठाकरेंनी घोलप यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून काल रात्रीच त्यांचे नाशकात आगमन झाले आहे. आज सकाळी नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे जाताना राज ठाकरे यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
बबनराव घोलपांचा राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिरातून दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने जात असताना माजी मंत्री बबनराव घोलप यांनी राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे आणि बबनराव घोलप यांनी एकेकाळी सोबत काम केले आहे. राज ठाकरे दिसताच बबनराव घोलप हे मोठ्या आतुरतेने त्यांना भेटण्यासाठी गेले. राज ठाकरे यांच्या गाडीजवळ येत घोलप यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र राज ठाकरेंनी बबनराव घोलप यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बबनराव घोलप आणि राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.