बार्शी – ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात उत्साह, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवत भव्य उत्सव साजरा करण्यात आला.
जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री ठीक १२ वाजता न्यायालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हजारो भीमप्रेमी नागरिक एकवटले होते. विद्युत रोषणाईने उजळलेल्या परिसरात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत ‘जय भीम’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
सकाळपासूनच शहरातील विविध भागांत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुतळा परिसरात महिला भगिनींसह भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेऊन महामानवांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
बार्शी शहरातील विविध भागात सार्वजनिक जयंती उत्सव मंडळांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. वृत्तपत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीनेही कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
पुतळा परिसरात द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यावतीने सकाळपासून दुपारपर्यंत भीमगीतांचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला. गायक पंडित राजगुरु, मिलिंद ताकपिरे आणि नयना राजगुरु यांनी सादर केलेल्या गीतांनी वातावरण भारावून गेले. तसेच पुतळा परिसरात डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने भिमसैनिकांना पाणी वाटप करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्यावतीने भीमसैनिकांना लाडू वाटप करण्यात आले.
जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यामध्ये आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार एफ.आर. शेख, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी सभापती युवराज काटे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, रणवीर राऊत, कृष्णराज बारबोले आदींचा समावेश होता.
मध्यवर्ती जयंती उत्सव भिम नगरची भव्य मिरवणूक
दुपारनंतर भीमनगर येथील मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्यावतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबतच तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळे उभारण्यात आले होते. पारंपारिक वाद्यांचा गजर, हलगी, संबळ, ढोल-ताशा, बँड पथक आणि आकर्षक सजावटींसह ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरुन उत्साहात पार पडली. विशेष आकर्षण म्हणून मिरवणुकीच्या अग्रभागी दोन उंट सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिला भगिनी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.


















