बार्शी – शहरातील परांडा रोड परिसरात मुस्लिम कब्रस्तानाजवळील रस्त्यावरील कंबरेएवढा खोल उघडा खड्डा सध्या नागरिकांच्या जीवावर उठला असून, तो अक्षरशः “मौत का कुऑं” बनला आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या बेजबाबदार व निष्काळजी कारभारामुळे रविवार दि.१२ एप्रिल रात्री या ठिकाणी दुचाकीवरुन जाणाऱ्या एका निष्पाप तरुणाचा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण रात्रीच्या वेळी दुचाकीवरुन परांडा रोडने जात असताना रस्त्याच्या मध्यभागी असलेला मोठा आणि खोल खड्डा त्याला दिसला नाही आणि तो थेट या खड्ड्यात कोसळला. हा अपघात पाहून स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
स्थानिक नागरिकांच्या मते, हा अपघात अचानक घडलेला नसून, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेचा हा परिणाम आहे. मागील दीड महिन्यांपासून नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाने या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले. जलदाय विभागाचे अभियंता यांना देखील अनेक वेळा फोनद्वारे कळविण्यात आले होते, मात्र, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या परिसरातील रस्त्यावरील वीज व्यवस्था देखील अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या कडेला असलेले बरेचसे वीज दिवे बंद आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांमुळे सुरु असलेल्या दिव्यांचाही प्रकाश अडवला जात आहे. परिणामी, संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेला असतो. अशा परिस्थितीत रस्त्यावर असलेले मोठे खड्डे दिसत नसून अपघातांचा धोका अधिकच वाढत आहे.
























