सोलापूर : आरटीओ कार्यालय परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीची माहिती मिळताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी वड, पिंपळासारख्या देशी व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांची तोड थांबवून शक्य त्या वृक्षांचे पुनर्लागवड करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आरटीओ परिसरात एकूण ११३ वृक्ष आहेत. त्यापैकी ३४ वृक्ष तोडण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने शेवरीच्या वृक्षांचा समावेश आहे. नियमानुसार व आवश्यक परवानगीनुसार शेवरीच्या काही वृक्षांची तोड करण्यात येणार असली, तरी वड, पिंपळ यांसारख्या महत्त्वाच्या वृक्षांना हात लावू नये, असे उपमहापौर देवकर यांनी स्पष्ट केले.परिसरातील पुनर्लागवड करणे शक्य असलेल्या १५ वृक्षांचे ‘रिप्लांटेशन’ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परवानगी नसलेल्या एकाही वृक्षाची तोड होणार नाही, याची दक्षता घेण्यासह वृक्षतोडीच्या प्रक्रियेत पर्यावरणविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपमहापौर देवकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांची भेट घेतली. वृक्षतोडीच्या प्रक्रियेवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवून पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. यास विजय पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २३ मधील मोकळ्या जागेत सुमारे ५०० मोठ्या आकाराच्या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाच फुटांपेक्षा मोठ्या आकाराची झाडे लावून परिसर अधिक हिरवागार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग व सोलापूर महानगरपालिका यांच्या समन्वयातून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विकासकामांसाठी वृक्षतोड अपरिहार्य ठरली तरी ती शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका उपमहापौर देवकर यांनी घेतली आहे. शक्य तेथे वृक्षांचे पुनर्लागवड करून त्यांचे संवर्धन करणे आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात नव्या वृक्षांची लागवड करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी परिवहन निरीक्षक प्रिया रोडगे, आरटीओ विभागातील कर्मचारी, महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचारी तसेच पर्यावरणदूत डॉ. मनोज देवकर आदी उपस्थित होते.
वृक्षतोडीऐवजी पुनर्लागवडीवर भर
वृक्षतोड हा शेवटचा पर्याय असावा. शक्य असेल तेथे वृक्षांचे पुनर्लागवड करून त्यांचे संवर्धन करणे आणि त्यासोबत नव्याने वृक्षलागवड करणे, हीच काळाची गरज आहे, असा संदेश उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिला.
—–
Post Views: 17