अक्कलकोट : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याच्या उद्देशाने बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात अक्कलकोट तालुक्यातील मौजे निमगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रमेश पुजारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या राज्यस्तरीय सोहळ्यात ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’, ‘राज्यस्तरीय सौंदर्य कला पुरस्कार २०२६’ आणि ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ या तीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड झालेल्या शासकीय व खासगी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, कलाकार, उद्योजक तसेच समाजसेवकांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अक्कलकोट तालुक्यातील निमगावचे रमेश पुजारी यांनी सामाजिक सलोखा, गावातील तंटे सामोपचाराने सोडविणे, पोलिस ठाण्याकडून सुमारे एक लाख रुपयेची बक्षीस मिळवून गावात लोकोपयोगी कामे केली तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय व्यासपीठावर अक्कलकोट तालुक्याचा गौरव झाल्याने त्यांच्या सन्मानाबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर सुनील मोहोड, अभिनेत्री निवेदिता पगार, अरुण भंडारे, डॉ. निलेश गायकवाड, ॲड. योगेश दवंगे, निलेश घोडेचोर, शुभांगी थोरात, प्रवीण मते व अमृत रोहोम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे व सचिव रचना ढोकचौळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले शिक्षक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. समाजासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्याबरोबरच इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देण्याचे काम या पुरस्कार सोहळ्यातून झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, विश्वस्त मंडळ आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या कार्याला मिळालेली प्रेरणा आणि समाजमान्यतेची पावती आहे.
— निवेदिता पगार, अभिनेत्री
Post Views: 13