पंढरपूर – साधारण चार दशकापूर्वी केवळ चार यात्रांवर जगणारे गाव, अशी ओळख असणारे पंढरपूर शहर गणेशोत्सव साजरा करण्यात मात्र सदैव उत्साही असायचे. मात्र अलिकडच्या काळात टिव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात हा उत्साह काहीसा गायब झालेला दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यावेळे प्रमाणे गणेश मंडपात (केवळ स्नान आणि जेवणासाठी सोडून ) इतर वेळी ठाण मांडून दहा दिवस मुक्कामी बसलेले दिसून येत नाहीत. तसेच आता पूर्वीसारखे लायटिंग माळा किंवा ऐतिहासिक आणि पौराणिक देखावे देखील सावर्जनिक गणेशोत्सव मंडळे सादर करीत नाहीत ही खरी खंत तो काळ अनुभवलेल्या मंडळींना आज मनाला हुरहूर लावुन जाते.
——————–
चौकट : ( महालक्ष्मीचा सण झाल्यावर गर्दी व्हायची )
१९८० ते ९० च्या काळात पंढरपूर येथील गणेशोत्सव म्हणजे धमाल असायची, गावात शेकडो गणेशमंडळे असायची, विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू असायची, महालक्ष्मी सण झाला की देखावे पाहण्यासाठी हजारो स्थानिक नागरिक रात्री एक, दोन वाजेपर्यंत प्रत्येक मंडळाना भेटी देत फिरत असत, अनेक कुटुंबवत्सल लोक फॅमिली सोबत एन्जॉय करीत असत, एखाद्या यात्रेसारखी तोबा गर्दी गणपतीचे देखावे पाहण्यासाठी त्याकाळी होत असे.
——————–
चौकट : ( चित्रपट दाखविण्याचा होते प्रस्थ )
काळाच्या ओघात आज असे चित्र दिसत नाही, मनोरंजनाची साधने वाढली आहेत, पुर्वी असे नव्हते, अनेक मंडळ १६ एमएम प्रिंट आणून मिनी प्रोजेक्टर वर गाजलेले मराठी, हिंदी चित्रपट दाखवत असत. विशेषतः गाताडे प्लॉट, मनीषानगर, रेल्वे कॉलनी, सांस्कृतिक भवन, उजनी वसाहत या ठिकाणी गणपतीच्या शेवटच्या दिवसात त्या काळात नावाजलेले सिनेमे दाखविले जात असे. फुकट चित्रपट पहायला लोक गदर्दी करत, तेव्हा गणेश मंडळे आपसातील स्पर्धेने आपआपल्या मंडळांचा नावलौकीक वाढावा या ईर्षने मंडळा मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करीत असत.
————————–
चौकट : ( मंडळांची नावे देखील असायची भन्नाट )
त्या वेळची मंडळांची नावे पण लय भारी असत. संतपेठेतील एका मंडळाचे अचानक तरूण गणेशोत्सव मंडळ, तर शहरातील दुसऱ्या एका मंडळाचे नाव एकाएकी तरुण मंडळ, काळामारुती परिसरातील मंडळाचे नाव स्वारगेट कॉर्नर तरुण मंडळ अशी एकापेक्षा एक भन्नाट होती. विशेष म्हणजे आज देखील ही सर्व मंडळे गणेशोत्सव साजरा करीत आहेत.
———————–
चौकट : ( चित्रपटातील दृश्ये सादर करण्यावर असायचा भर )
शहरातील अनेक गणेशोत्सव सार्वजनिक मंडळातून महाभारत, रामायण मधील देखावे बरोबरच चक्क हिंदी सिनेमातील दृश्य होत, गांधीरोड येथील मंडळाने गोविंदाच्या हत्या सिनेमातील थरकाप उडविणारे दृश्य साकारले होते, घोंगडे गल्ली येथील मंडळाने अंकुश, प्रतिघात या सारख्या चित्रपटातील दृश्ये सादर केलेली होती. अमिताभ बच्चन यांचा याराना हा चित्रपट गाजला होता त्यावेळी शहरातील एका तरुणाने चक्क लाईटच्या माळा असणारा ड्रेस परिधान करुन, सारा जमाना, हसिनो का दिवाना, हे डिस्को गीत सादर केले होते. तेव्हा ते पाहण्यासाठी तोबा गर्दी होत असे, पोलिसांना बोलावून काही मंडळांना गर्दी नियंत्रित करावी लागे.
पंढरीतील नाथचौक गणेशोत्सव तरुण मंडळाने १९८३ साली जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री यांचा त्याकाळी सुपर हिट ठरलेल्या हिरो या चित्रपटात प्यार करनेवाले कभी डरते नहीं, हे गीत होते, याचा देखावा सादर केलेला होता. विशेष म्हणजे यावेळी शम्मी कपूर यांची भूमिका साकारणारा येथील स्थानिक कलाकार अगदी हुबेहुब दिसत होता, त्याच्या अभिनयाने हे दृश्य गाजले होते.
या बरोबरच गांधीरोडवरील बेलापूरकर मठा जवळील गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मुर्ती देखील पाहण्या सारख्या असत. कोल्हापूरातील पुरेकर बुवा हे कलाकार या मंडळांच्या मुर्ती तयार करीत असत. मुर्ती अतिशय लहान असत मात्र त्या सुबक, आकर्षक आणि वेगळ्या घाटणीच्या असून पाहताक्षणी नजरेत भरणाऱ्या असत. या बरोबरच इंदिरा गांधी भाजी मंडई मधील गणेशोत्सव मंडळाचा देखील गणेशोत्सव पाहण्यासाठी आवर्जून लोकांची गर्दी होत असत.
दरम्यान आज चाळीशी, पन्नाशी पार केलेल्या अनेकांना पूर्वीचे उत्साही वातावरणात आठवत आहे. मात्र या सगळ्या मंडळींना खंत आहे ती तेव्हाचा उत्साह, चैतन्यमय वातावरण आज मात्र कुठेही दिसून येत नाही याचीच.
———————
चौकट : ( एसटी स्थानकावरील छोट्या लालपरीचे आकर्षण )
पंढरपूर येथील जुन्या एसटी स्टैंड मध्ये गणपती बसवत असत, तेव्हा बॅटरीवर धावणारी छोटी लाल बस लहानग्यां बरोबरच मोठ्यांचे देखील आकर्षण ठरत असत. या बरोबरच एस.टी. स्थानकावर कारंजे तसेच उजनी धरणाचा केलेला देखावा आज देखील लक्षातून जात नाही. एसटीस्थानकावरील गणेशोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी दहा दिवस मोठी गर्दी होत असे.
——————
चौकट : ( वेताळाच्या पालखींमुळे उडायची घाबरगुंडी )
गणेशोत्सवा मध्ये येथील नरवीर तानाजी चौक गणेशोत्सव मंडळांकडून महालक्ष्मी सणा नंतर दररोज वेगवेगळी पौराणिक, त्या त्यावेळच्या सामाजिक स्थितीवर संदेश देणारी सजीव दृश्ये सादर होत असत. या मंडळाचे खास वैशिष्ठ म्हणजे या मंडळांकडून अनंतचतुर्थीच्या आदल्या दिवशी खास वेताळाची पालखी हा सजीव देखावा सादर केला जायचा. या देखाव्या मध्ये अनेक शाळांमध्ये असलेल्या प्रयोगशाळेतील हाडाचे सापळे खास मागून आणले जायचे. मंडळातील लहानग्यां पासून ते मोठ्या पर्यंत अनेकांना आक्राळविक्राळ मेकअप करुन भयभयीत होणारे संगीत वाजवून हा देखावा सादर केला जात असत. त्यावेळी हाडाच्या कवठ्या, हाडे प्रत्येक सहभागी कलाकरांच्या हाता मध्ये असत. त्यावेळी कुटुंबातील मोठ्या मंडळींबरोबर असलेले लहानगे हा देखावा पाहून घाबरुन जात असत, रडत असत. मात्र या मंडळाचा देखावा पाहिल्याशिवाय शहरातील नागरिकांचा गणेशोत्सव पुर्ण होत नसे.
Post Views: 11