मोडनिंब – (ता. माढा) येथे भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथील प्राचीन श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्या वतीने महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त शहरातून भव्य पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली. सकल जैन समाजाने आयोजित केलेल्या प्रभातफेरीत “अहिंसा परमो धर्म” आणि “महावीर भगवान की जय” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. पालखी सोहळ्यात जैन समाजातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी ७ वाजता मंदिरात अभिषेक पूजेनंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. सायंकाळी ६.३० वाजता पाठशाळेतील विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल पद्धतीवर आधारित प्रश्नोत्तर व पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील बक्षिसे अशोक साळवी यांच्या तर्फे देण्यात आली.
यानंतर सायंकाळी ७.३० वाजता भगवान महावीर यांचा नामकरण विधी संपन्न झाला. यावेळी मातेचा मान सौ. सौ निर्जरा सार्थक शहा , आत्याचा मान कु. रचना रोहित शहा , तर मातेची ओटी भरण्याचा मान सौ. भाग्यश्री धीरज पुरवत यांनी घेतला.
पुढे पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच सकल जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. भगवान महावीरांच्या तैलचित्राची पालखी रथातून शहरातून काढण्यात आली.
शोभायात्रेत ‘वितराग’ ढोल पथकाच्या गजराने वातावरण उत्साहाने भारावून गेले. श्रावक-श्राविका तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
शोभायात्रेनंतर मंदिरात पंचामृत अभिषेक, पाळणा व आरती करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सखुबाई रामचंद्र ट्रस्टचे सारंग शहा, संस्थेचे अध्यक्ष विशाल मेहता, गुरसाळकर दादा, राहुल शहा, सुनील पुरवत, बाहुबली मेहता, नीलेश गुरसाळकर, अजित खडके, राहुल गांधी, रोहित गांधी, अरुण कळसकर, शितल गांधी, परिमल दोशी , राजकुमार शहा, सुबोध रामढवे, प्राजक्त शहा, प्रितम शहा ,संकेत पुरवत.यांच्यासह महिला मंडळ व सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय व आनंदी वातावरणात पार पडला.















