सोलापूर – भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) हे रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून, देशभरातील लाखो प्रवाशांना पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्रातील दर्जेदार सेवा पुरवत आहे.
आयआरसीटीसीतर्फे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर येथून ‘भारत गौरव पर्यटक रेल्वे’द्वारे ११ रात्री / १२ दिवसांची ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या विशेष पर्यटन पॅकेजद्वारे भाविकांना उदयपूर, नाथद्वारा, पुष्कर, जोधपूर, जयपूर, खाटू श्यामजी आणि उज्जैन या प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या यात्रेचे पॅकेज प्रति व्यक्ती ₹१८,६७० पासून उपलब्ध आहे.
यावेळी गौरव झा, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी पश्चिम विभाग, म्हणाले,”ही विशेष भारत गौरव पर्यटक रेल्वे भाविक आणि वारसा पर्यटनप्रेमींना सुरक्षित, आरामदायी आणि नियोजनबद्ध प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या यात्रेद्वारे देशातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडविण्यासोबतच आयआरसीटीसीच्या उत्कृष्ट सेवांचाही लाभ प्रवाशांना मिळणार आहे.”
प्रवासी इकॉनॉमी स्लीपर (SL), स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC या तीन श्रेणींपैकी आपल्या सोयीनुसार प्रवासाचा पर्याय निवडू शकतात. या विशेष पर्यटक रेल्वेमध्ये सुमारे ७५० प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम या स्थानकांवरून चढण्याची आणि उतरण्याची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांना या यात्रेचा मोठा लाभ मिळणार आहे.























