सोलापूर : धार्मिक, ऐतिहासिक व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात रोजगारनिर्मितीच्या मोठ्या संधी आहेत. शेतकरी, युवक व महिलांनी कृषी पर्यटनाकडे वळून स्वयंरोजगार निर्माण करावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा पर्यटन मार्गदर्शक कांतप्पा खोत यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त ड्रीम फाउंडेशन, सोलापूर पर्यटन विकास मंच व ड्रीम युवा बिझनेस फोरमच्या वतीने रविवारी ‘नमो सोलापूर पर्यटन जागर संमेलन’ घेण्यात आले. सोरेगाव-कुमठे रोडवरील श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्रात झालेल्या संमेलनात पर्यटनाच्या संधी, ब्रँडिंग, विपणन, शासकीय योजना व सहकार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे, नगरसेविका संगीता जाधव, डॉ. वासंती पांढरे, डॉ. संतोष राठोड, डॉ. सुनील वाघमारे, मेघा क्षीरसागर, गजराबाई भतगुणकी, संस्थापक काशिनाथ भतगुणकी, युनूस शेख, समन्वयक सतीश पाटील, राहुल पाटील, सिद्धाराया कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
खोत म्हणाले, अस्सल सोलापुरी हुरडा पार्टीचे प्रभावी ब्रँडिंग करावे. चादर, टॉवेल, ज्वारी, डाळिंब, ऊस, केळी आदी सोलापुरी उत्पादनांचे जागतिक मार्केटिंग करण्यासाठी ‘अस्सल सोलापुरी महोत्सव’ देशभर आयोजित करण्याची गरज आहे.
संमेलनाचे प्रास्ताविक काशिनाथ भतगुणकी यांनी केले. १५० हून अधिक युवक, महिला व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.सेंद्रिय शेती व शिवार फेरीने कार्यक्रमाची सांगता झाली.
—-
Post Views: 4