सोलापूर : येथील ब्राह्मण समाज सेवा संघ आणि डॉ.
त्रिंबक लक्ष्मण चाटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी जीवन गौरव आणि समाजभूषण पुरस्कार दिले जातात. त्याप्रमाणे यावर्षी गणेश वसंत तथा भाऊ तोरसेकर यांना जीवनगौरव तर हरी रामचंद्र मुस्तीकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती ब्राह्मण समाज सेवा संघाचे अध्यक्ष दत्तराज कुलकर्णी आणि चाटी ट्रस्टच्या अध्यक्षा मीनाताई चाटी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवी पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अर्थात शिवस्मारक* येथे होणार आहे. हा कार्यक्रम सोलापूरचे उद्योगपती *हरी एकनाथ गोडबोले* यांच्या हस्ते होईल. प्रत्येकी २५ हजार रुपये, शाल श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी भाऊ तोरसेकर यांचे पत्रकारितेचा प्रवास या विषयावर व्याख्यानही होणार आहे असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
यापूर्वी डॉ. एम.जी.प्रधान, डॉ. अलबाळ, डॉ. जी. जी. जोग, डॉ. विजय कानेटकर, डॉ. मंजिरी चितळे, डॉ . माधवी रायते, डॉ. अरविंद देखणे, डॉ. संजीवनी केळकर, डॉ. एम.के. इनामदार यांना जीवन गौरव पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. तसेच डॉ. प्रा. राजाराम जोशी, पी.एम. हर्षे, ऍड. भास्करराव तथा तात्या नेर्लेकर, अरुण देशपांडे, मुकुंदराव कुलकर्णी, अरविंद जोशी, डॉ. जयंत करंदीकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी, समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही मीनाताई चाटी यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस सचिव राम तडवळकर, संचालक माधव देशपांडे, सुधीर कुलकर्णी, महेंद्र देवस्थळी, संतोष सरदेशमुख, वामन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Post Views: 9