सोलापूर – विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक व स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषद प्रशासनाने शासकीय वाहनांबाबत कडक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या सभापतींच्या वापरातील शासकीय वाहने तातडीने जिल्हा परिषद यंत्रशाळेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी २२ सप्टेंबर रोजी संबंधित पदाधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिले आहे. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे आणि शासकीय साधनसामग्रीचा निवडणूक कामासाठी गैरवापर होऊ नये, यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण व आरोग्य समिती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती तसेच कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतींच्या वापरातील वाहनांचा यामध्ये समावेश आहे. संबंधितांनी आपापल्या ताब्यातील वाहने तात्काळ यंत्रशाळेत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शासकीय वाहनांच्या वापराबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या दैनंदिन शासकीय दौऱ्यांवरही मर्यादा येणार आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत शासकीय वाहनांच्या वापराबाबत प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचे या आदेशातून स्पष्ट झाले आहे.
चौकट
वाहनाची संपूर्ण नोंद घेणार
वाहन जमा करताना त्याची सद्यस्थिती, किलोमीटर रीडिंग, इंधनाची उपलब्धता, वाहनासोबत असलेले साहित्य तसेच संबंधित कागदपत्रांची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर वाहनाचा ताबा अधिकृतरीत्या यंत्रशाळेकडे देण्यात येणार आहे.
Post Views: 8