सोलापूर – रेल्वेच्या ७९व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ‘सेंट्रल रेल्वे परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट’ संघाने ‘श्री स्वामी समर्थ अक्कलकोट क्लब’वर मात करत उपांत्य फेरी गाठली.
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूटच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर अक्कलकोटचा डाव पत्त्यासारखा कोसळला. संपूर्ण संघ केवळ ६८ धावांवर तंबूत परतला. अक्कलकोटकडून संकेत गायकवाडने सर्वाधिक १६, विठ्ठल गुंठेने ११ तर अविनाश फटाटेने ७ धावा केल्या. परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूटच्या इम्रान हक याने अवघ्या ४ षटकांत केवळ ७ धावा देत ४ महत्त्वाचे बळी टिपले. त्याला मन्मद हाशिम (२-८), आर्यन देशमुख (२-७) आणि कासिम मलिक (२-१६) यांनी सुरेख साथ दिली.
६९ धावांचे सोपे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट संघाने ८ व्या षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात ७० धावा करत विजयश्री खेचून आणली. सुरज कुरमेने ३४ धावांची धडाकेबाज नाबाद खेळी केली, तर आर्यन देशमुखने २७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अक्कलकोट क्लबकडून गोलंदाजीत अविनाश फटाटेने १ षटकात अवघ्या १ धावेच्या मोबदल्यात २ बळी घेतले, तर जफर आतारला १ बळी मिळाला.
उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या इम्रान हक याला ‘सामनावीर’ पुरस्कार अतुल बांदेवाडीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विक्रांत पवार, नवीन माने आणि रामबसू माळव उपस्थित होते. कै. सुरेश मालप यांच्या स्मरणार्थ सुदेश मालप व सुनील मालप यांनी ही आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केली आहे. सामन्याचे पंच म्हणून सोहेल शेख आणि प्रवीण कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर गुणलेखन सचिन गायकवाड यांनी केले.
आजचे उपांत्य फेरीचे सामने
सकाळी: साउथ सोलापूर आपटे ब्लू विरुद्ध मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी
दुपारी: मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट विरुद्ध परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट























