
सोलापूर – सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेत यंदा प्रथमच समुपदेशनाधारित आणि तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, या प्रक्रियेमुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. राज्यातील ४,५०६ बदलीपात्र कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शिफारसी करण्यात आल्याने ही प्रक्रिया यशस्वी ठरली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पारदर्शक बदली व्यवस्थेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप मिळाले आहे. सेवा ज्येष्ठता, कर्मचाऱ्यांचा पसंतीक्रम, दुर्गम भागातील सेवा, वैद्यकीय कारणे आणि कौटुंबिक परिस्थिती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा विचार करून बदल्या करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रधान सचिव, सचिव-२ आणि आयुक्त आरोग्य सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक आरोग्य सेवा (प्राथमिक) यांनी संपूर्ण प्रक्रियेचे काटेकोर नियोजन केले. प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, हरकतींचे तातडीने निवारण, प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण आणि राज्यस्तरीय निरीक्षकांची नियुक्ती यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि वादमुक्त राहिली.
या बदल्यांमध्ये परिचारिका संवर्गातील १,५७५, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) संवर्गातील ८०८, कनिष्ठ लिपिक संवर्गातील १९७, औषध निर्माण अधिकारी संवर्गातील १६० आणि प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गातील १४९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनीही या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासनातील कार्यक्षम व्यवस्थापनाचा नवा मापदंड निर्माण केल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. संचालक आरोग्य सेवा (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांनी सांगितले की, यंदाच्या बदली प्रक्रियेला कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. त्यामुळे सर्वांच्या सहभागातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने बदल्या पारदर्शकपणे पूर्ण करता आल्या.
Post Views: 8