सोलापूर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी करमाळा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. ग्रामपंचायत स्तरावरील कामांना गती देतानाच नागरिकांना योजनांचा थेट लाभ मिळतोय की नाही, यावर त्यांनी भर दिला. विशेषतः घरकुल योजना, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
करमाळा पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विकासकामे, विविध शासकीय योजनांची प्रगती आणि ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत आणि आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जैन यांनी ग्रामसेवकांना दिले.
यानंतर वीट येथील जलतारा प्रकल्पाला भेट देऊन जैन यांनी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. पूर्ण झालेली कामे, सुरू असलेली कामे आणि आगामी नियोजनाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेत त्यांनी जलसंधारण व पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. कामे गुणवत्तापूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
वीट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही त्यांनी भेट दिली. वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा, शौचालये आणि शाळेतील एकूण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले. यावेळी शाळा परिसरात जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धनातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान कोर्टी येथील आरोग्य केंद्राचीही पाहणी करण्यात आली. रुग्ण तपासणी कक्ष, औषध विभाग, प्रयोगशाळा, प्रसूती विभाग, लसीकरण विभाग, रुग्ण नोंदणी आणि स्वच्छता व्यवस्थेचा जैन यांनी आढावा घेतला. रुग्णांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, औषधांचा पुरेसा साठा ठेवावा आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, ग्रामपंचायत देवीचा माळ येथे भेट देऊन जैन यांनी देवीचे दर्शन घेतले तसेच स्थानिक पातळीवरील विविध बाबींची माहिती जाणून घेतली. या दौऱ्यात गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, सचिन जगताप यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
कोट
ग्रामीण युवकांसाठी जिमची सुविधा
ग्रामपंचायत वीट येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जिमचे उद्घाटन जैन यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील युवक आणि नागरिकांना व्यायामाची सुविधा उपलब्ध करून देत आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही सुविधा उभारण्यात आली आहे.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जि.प.
Post Views: 14