सोलापूर – जिल्हा आरोग्य विभागातील आर्थिक व प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घडामोडींना वेग आला असून, जिल्हा लेखा व्यवस्थापक (डॅम) पदाचा पदभार वैशाली थोरात यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी दुजोरा दिला आहे. प्राप्त माहितीनुसार थोरात यांच्या कामकाजाबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. कोपूरवाड यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आरोग्य विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून कंत्राटदारांची बिले वेळेत मंजूर न होणे, सोशल मीडियाच्या देयकांचा निपटारा रखडणे, विविध योजनांच्या आर्थिक प्रस्तावांना विलंब होणे, तसेच रुग्णवाहिका चालकांच्या वेतन वितरणात अडथळे निर्माण झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या कारणांमुळे विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याची नाराजी संबंधित घटकांकडून व्यक्त केली जात होती.
याशिवाय कार्यालयीन कामकाजात अनियमितता, कर्मचाऱ्यांशी वादग्रस्त वर्तन आणि निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब याबाबतही वरिष्ठांकडे तक्रारी दाखल झाल्याचे सांगितले जाते. या सर्व बाबींची दखल घेत संबंधित कामकाजाची चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर एकाचवेळी चौकशी आणि पदभार कायम ठेवणे, योग्य नसल्याने वरिष्ठ स्तरावरून जिल्हा लेखा व्यवस्थापकपदाचा पदभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे थोरात यांना तात्पुरती एन.एच.एम. विभागामध्ये ईतर जबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रलंबित आर्थिक प्रस्ताव आणि विविध देयकांच्या मंजुरीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य विभागातील आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणा करण्याची गरजही अधोरेखित होत आहे.
दरम्यान, चौकशी अहवालानंतर संबंधित प्रकरणात पुढील प्रशासकीय निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे चौकशीचा अंतिम अहवाल आणि प्रशासनाची पुढील भूमिका याकडे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.
कोट
प्राप्त तक्रारीनुसार चौकशी सुरू असून, चौकशी वेळी पदावर राहणे योग्य नसल्याने थोरात यांचा सोमवारी पदभार काढून घेतला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, यासंबंधी पर्यायी व्यवस्था लवकरच केली जाणार आहे.
– डॉ. सतिश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा
कोट
आरोग्य विभागातील अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागात जबाब घेण्यात आले. गेल्या काही दिवसापासून थोरात यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जिल्हा लेखा व्यवस्थापक पदाचा पदभार काढण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून अधिकृत पत्र लवकरच येणार आहे.
– डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर
























