सोलापूर : देगाव कालवा, एकरूख उपसा सिंचन योजना आणि कारंबा पंप हाऊसच्या कामांतील कथित त्रुटींची सखोल चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी देगाव कालवा, एकरूख उपसा सिंचन योजना आणि कारंबा पंप हाऊसच्या कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे निवेदन सादर केले होते. देगाव कालव्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, जलसेतूंना गळती तसेच कारंबा पंप हाऊसच्या चुकीच्या डिझाइनमुळे संपूर्ण योजनेवर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या त्रुटींमुळे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत गुरुवारी विधानभवन, मुंबई येथील उपाध्यक्ष दालनात अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाचे कार्यकारी अभियंता वेंकटेश चौबे ,भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता, उजनी कालव्याचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ व सर्वंकष चौकशी करून आठ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्वाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. जनहिताच्या कामात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिला आहे.
—
Post Views: 7