सोलापूर – रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला पारदर्शक पद्धतीने योग्य बाजारभाव मिळावा, तसेच रेशीम व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या रेशीम संचालनालय, नागपूर आणि श्री सिद्धेश्वर कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम कोषाच्या नियंत्रित लिलावाला शनिवार, दि. १ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. हिरज येथील रेशीम कोष बाजारपेठेत सकाळी ९ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे.
या लिलाव व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आपला रेशीम कोष थेट बाजारात विक्रीसाठी आणण्याची संधी उपलब्ध होणार असून, खुल्या आणि स्पर्धात्मक लिलाव प्रक्रियेतून उत्पादनाला योग्य किंमत मिळण्यास मदत होईल. त्यामुळे दलालांवरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक हित साधले जाणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन श्री सिद्धेश्वर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रेशीम संचालनालयाचे पुणे विभागाचे सहाय्यक संचालक विठ्ठल फड प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य, सचिव अतुलसिंग रजपूत आणि रेशीम विकास अधिकारी (श्रेणी-१) विनित पवार यांची उपस्थिती राहणार आहे.
रेशीम उत्पादनाला अधिक संघटित बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. नियंत्रित लिलावामुळे गुणवत्तेनुसार दर निश्चित होणार असल्याने उत्पादकांना अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवहाराचा लाभ मिळेल. भविष्यात रेशीम शेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अशा बाजारव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
रेशीम विकास अधिकारी आणि बाजार समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला रेशीम कोष विक्रीसाठी हिरज येथील रेशीम कोष बाजारपेठेत आणून नियंत्रित लिलावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमित लिलाव व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना बाजारभावाची खात्री, पारदर्शक व्यवहार आणि अधिक आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.