सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यानंतर महापालिकेत नवे कारभारी काम पाहणार आहेत. या अनुषंगाने नव्या कारभाऱ्यांसाठी महापालिकेतील कै. यशवंतराव चव्हाण सभागृह (कौन्सिल हॉल)चे युद्ध पातळीवर सुशोभीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिका सभागृह, महापौर , उपमहापौर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची रंगरगोटी व इतर कामे सुरू आहेत. महापालिकेच्या पहिल्या सभेसाठी सभागृह सज्ज ठेवण्यात येत आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी दिनांक 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेत नवे कारभारी कारभार पाहणार आहेत. सोलापूर महापालिकेतील कौन्सिल हॉल मधील महापौर, उपमहापौर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी कामकाज पाहतात. इमारतीतील महापालिकेचे मुख्य सभागृह, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती यांच्यासह इतर सर्व कार्यालयांची रंगरगोटी करण्यात येत आहे. या सर्व इमारतीला आतून बाहेरून रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात येत आहे.
महापालिकेच्या सभागृहात रंगरंगोटी बरोबरच डायस वरील फर्निचर पॉलिशिंग, नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेचा सोफा पॉलिशिंग, मॅट बदलणे, माईक दुरुस्ती, नवे पडदे यासह या सभागृहाचा लुक बदलण्यात येत आहे. सर्वच कार्यालयातील फर्निचर, नवे मॅट, आवश्यकतेनुसार खुर्च्या बदलण्यात येत आहेत. सर्वच कार्यालयातील स्वच्छतागृह नूतनीकरण करण्यात येत आहे.
कौन्सिल हॉल सभागृहावरील पत्र्यांना टर्पेंटिंग ट्रीटमेंट करण्यात येणार आहे. गच्ची वॉटरप्रूफिंग करण्यात येत आहे. या सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याचे काम मक्तेदार मनीष गांगजी यांना देण्यात आले आहे. मनीष गांगजी यांच्या माध्यमातून सभागृहाला नवा लुक देण्याचे काम करण्यात येत आहे. नव्या कारभाऱ्यांसाठी ही इमारत सर्व सुविधायुक्त आणि दिमाखदार अशा पद्धतीने सज्ज ठेवण्यात येत आहे.
या सर्व इमारतीतील सभागृहासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यालय चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत. आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. येत्या 14 जानेवारीपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती मक्तेदार मनीष गांगजी यांनी दिली.
















