सातारा – जात, धर्म, पक्ष ,पंथ या सर्वाला दूर ठेवून स्त्री, पुरुष, नावे उजवे असे कोणतेही मानदंड न लावता सर्वधर्मसमभाव राखत ज्याने समाजासाठी झोकून देऊन काम केले ,त्या व्यक्ती आणि संस्थांनाच हा सातारा भूषण पुरस्कार दिला जातो आहे असे विचार जेष्ठ शास्त्रज्ञ विचारवंत समीक्षक व लेखक दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केले .
सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या सातारा भूषण पुरस्कार सोहळा वितरण कार्यक्रमात अध्यक्ष भाषणावरून दत्तप्रसाद दाभोलकर बोलत होते . रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, राजकीय तसेच सामाजिक अशा क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला / संस्थेला “सातारा भूषण” पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी ट्रस्टने श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना सदर पुरस्काराने सन्मानित करत रोख रु. ४०,०००/- व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते . ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांच्या हस्ते हा सातारा भूषण पुरस्कार श्रीनिवास पाटील यांना प्रदान करण्यात आला .यावेळी जेष्ठ विचारवंत शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोलकर,ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले, उदयन गोडबोले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती
याप्रसंगीआपल्या प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले यांनी, स्वर्गीय भाऊकाका गोडबोले यांनी 5,000 रुपयाची पुंजी घालून सुरुवात केलेला हा ट्रस्ट आज परिवाराने एक कोटी रुपयांच्या निधीपर्यंत नेला असून विविध उपक्रम ट्रस्ट मार्फत चालू आहेत .गोरगरीब विद्यार्थी शिक्षण संस्थांना मदत देत आज स्व . अरुण गोडबोले यांनी 35 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा पुरस्कार विविध मान्यवरांची व्याख्याने ,परिसंवाद ,चर्चासत्रे ,गायन कार्यक्रम सुरू करून सातारकरांना आनंद मिळवून दिला. पुरस्कार आज श्रीनिवास पाटील यांनी स्वीकारला याबद्दल कृतज्ञता वाटते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, दर वेळेला गेली 36 वर्षे या पुरस्काराची निवड समितीमध्ये एक विश्वस्त म्हणून काम करताना स्वर्गीय अरुण गोडबोले यांच्या नियोजनाने हा पुरस्कार देण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जात होती .आज श्रीनिवास पाटील हे पक्ष विरहित आणि राजकारणाशी संबंधित असलेले अपवादात्मक उदाहरण आहेत. कारण हे राजकारणात जरी होते तरी सुसंस्कृत कसे राहता येते याचे अपवादात्मक उदाहरण म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्रीनिवास पाटील म्हणाले की ,गोडबोले कुटुंबीयांनी गोड बोलून दिलेले हे देणे आहे .स्वर्गीय अरुण रावांचा शब्द पुढील पिढीने आणि गोडबोले परिवाराने पाळला. .. दे लेका नव्हे तर घे लेका.. हे होत असताना मध्ये काही वेळ गेला, मात्र मी हा पुरस्कार घेण्याचा शब्द पाळला .आज या पुरस्काराने खरोखरच गोडबोले कुटुंबीयांनी माझी उंची वाढवली आहे .तरकतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी,छोटा स्वर गंधर्व, राजमाता सुमित्राराजे भोसले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांना हा पुरस्कार वितरण होत असताना मी या कार्यक्रमांना उपस्थित होतो. आज शिक्षणाला मदत करणारे रा. ना . काका फार मोलाची कार्य करणारे ठरले.
आज हेच कार्य 5000 रुपयाच्या निधीवरून एक कोटीच्या घरात त्यांच्या पुढील पिढीने नेले याचे खूप कौतुक वाटते ,आनंद वाटतो .मान्यवरांच्या ओळीत बसण्याचा मान मला या पुरस्काराने गोडबोले परिवाराने दिला आणि हे सातारा भूषण क्षण मी खऱ्या अर्थाने जगतो आहे. या मिळालेल्या निधीचा वापर मी माझ्या परिवारासोबत पुढील गरजू आणि अपेक्षित व्यक्ती आणि संस्थांसाठीच वितरित करी न आणि घासातील घास व प्रेम वाटून देण्याची बुद्धी मला परमेश्वराने द्यावी अशीच सदिच्छा आणि अपेक्षा मी सर्वांकडून व्यक्त करतो अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी बोलताना प्राचार्य पुरुषोत्तम शेठ म्हणाले की ,अरुण हा आजातशत्रू असा मित्र होता .रस्त्यावरच्या साफसफाई करणाऱ्या कामगारापासून ते मंत्री आणि मान्यवरांची मैत्री जोडणारा अरुण आपल्यात आज नाही .मात्र त्याच्या अपेक्षेप्रमाणेच हा पुरस्कार त्याचे मित्र श्रीनिवास पाटील यांना वितरित करताना विशेष आनंद होत आहे .विविध चित्रपट निर्मितीत काम करताना सुबल सरकार सारख्या नृत्यदिग्दर्शकाच्या शस्त्रक्रियेसाठी 50,000 ची मदत करणारा अरुण आम्ही विसरू शकत नाही .आज स्वर्गीय अरुणची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. मात्र त्याने घालून दिलेली ही वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा व धुरा आज गोडबोले परिवार व अच्युत गोडबोले पुढे नेत आहेत. त्या खंड पडू दिला नाही याची विशेष कौतुक वाटते . कारण परंपरा संपून वेगळे रूप प्राप्त होते, मात्र ट्रस्ट ने आपले काम योग्यपणे पुढे ठेवले आहे आणि मैत्री कशी जपावी याचे हे उत्तम उदाहरण आज आपण श्रीनिवास पाटील यांना पुरस्कार देताना पाहत आहोत .श्रीनिवास पाटील यांचे सुरू असलेले सामाजिक बांधिलकीचे काम या पुरस्काराने अधिकच वृद्धिंगत होणार आहे. तसेच जनतेच्या मनातील त्यांचे स्थान असेच आढळ राहील अशा शब्दात त्यांनी श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य रमणलाल शहा, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे,डॉ. सुहास जोशी, विनोद झंवर, डॉ.चैतन्य गोडबोले, उदयन गोडबोले ,आर्यन गोडबोले , दिलीप भट्टड, कन्हैयालाल राजपुरोहित, रमण वेलणकर,हरेश जोशी,डॉ.धनंजय देवी, प्रकाश गवळी, हेमंत बर्गे, श्रीराम नानल, दिलीप पाठक, सौ.गौरी तामणकर, गौतम भोसले, अविनाश लेवे, प्रकाश बडेकर, सारंग पाटील,श्रीकांत शेटे.अनिल काटदरे, श्रीनिवास पाटील परिवाराचे कुटुंबातील सदस्य , ग्रामस्थ यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

























