सोलापूर : शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील बाळे परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वसंत विहार, स्वराज विहार, धनेश्वरी नगर, संकेत थोबडे नगर, बालाजी ब्लू अपार्टमेंट आणि गणेश नगर या सहा परिसरांतील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने प्रशासनाने केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता समस्येच्या मुळाशी जाऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण पाणीपुरवठा जलवाहिनीची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले. जलवाहिन्यांमधील गळती, तांत्रिक बिघाड आणि अन्य त्रुटी शोधून त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल, यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेविका अलका भवर, आनंद भवर, शेखर इगे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दूषित पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. नागरिकांना शुद्ध पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
शुद्ध पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा
दूषित पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. जलवाहिन्यांची तपासणी करून दोष दूर करावेत आणि नागरिकांना नियमित शुद्ध पाणी मिळेल याची खात्री करावी, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आ. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
Views: 12