अक्कलकोट – गोवा राज्यातील पणजी येथे आयोजित भव्य विश्व कन्नडिगा सन्मान सोहळ्यात झी कन्नड सारेगमप फेम दिव्यांग गायक रेवणसिद्ध पुंडलिक फुलारी यांना प्रतिष्ठेचा ‘विश्व कन्नडिगा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कन्नड चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गीतकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि साहित्यिक डॉ.वी नागेंद्रप्रसाद यांच्या हस्ते रेवणसिद्ध फुलारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कन्नड विचारवंत आयोजक, चंद्रशेखर माडलगेरी, गोवा कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी , यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जन्मतः दृष्टिदोष असतानाही आपल्या अद्वितीय गायनकौशल्याच्या बळावर रेवणसिद्ध फुलारी यांनी राज्यासह राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. झी कन्नडच्या लोकप्रिय ‘सारेगमप’ या संगीत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी लाखो रसिकांची मने जिंकली. गायन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना रेवणसिद्ध फुलारी यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच आपल्या गुरूजनांचे, कुटुंबीयांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. या सन्मानामुळे त्यांच्या कला प्रवासाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास श्रीशैल रब्बा, रविकुमार देगाव, शरणप्पा फुलारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कन्नडप्रेमी आणि संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेवणसिद्ध फुलारी यांना मिळालेल्या या आंतरराज्यीय सन्मानामुळे सोलापूर जिल्हा आणि अक्कलकोट तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
फोटो ओळ – गोवा पणजी येथे गास्पर टेनिस कोर्ट सभागृहात आयोजित विश्व कन्नड संमेलनात प्रसिद्ध गीतरचनाकार,अभिनेते निर्देशक डॉ. वी नागेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झी सारेगमप फेम रेवणसिद्ध फुलारी यांना विश्व कन्नडिगा पुरस्कार प्रधान करताना प्रसिद्ध लेखक राजशेखर मठपती,चंद्रशेखर माडलगेरी आदी दिसत आहे.
Post Views: 8