
सोलापूर – ‘विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात मॉडेल क्रिकेट अकॅडमीने करियर अकॅडमीचा ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विवेक आणची आणि मारुती कांबळे यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर मॉडेल अकॅडमीने करियर अकॅडमीचे आव्हान अगदी सहज मोडीत काढले.
येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर झालेल्या सामन्यात करियर अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मॉडेल अकॅडमीच्या अचूक गोलंदाजीसमोर करियर अकॅडमीचा डाव २९ षटकांत १२३ धावांवर आटोपला. करियर अकॅडमीकडून खिजर शेखने ३३ धावा, विजयानंदने २९ धावा आणि झैद नदाफने २६ धावा केल्या. मॉडेल क्रिकेट अकॅडमीकडून गोलंदाजी करताना अक्षय हावळे आणि स्वराज वाले यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर सत्यजित जाधव, यश बोरामणी आणि प्रथमेश राठोड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
विजयासाठी मिळालेले १२४ धावांचे आव्हान मॉडेल क्रिकेट अकॅडमीने अवघ्या ११.१ षटकांत २ गडी गमावित १२५ धावा करत पूर्ण केले. सलामीवीर विवेक अणची याने ५८ धावांची तर मारुती कांबळे याने ४४ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात पंच म्हणून अशोक डोंबाळे आणि शुभम मुत्तुर यांनी कामगिरी बजावली, तर गुणलेखन अनिल सलगर यांनी केले.























