धाराशिव : लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची खासदार ओमराजे निंबाळकर भेट घेतली. मतदारसंघाच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्याबाबत अमितजी शहाकडूनही सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सोमनाथ गुरव यांनी दिली.
यावेळी गुरव म्हणाले की, धाराशिव-तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्पातील उर्वरित तुळजापूर ते सोलापूर रेल्वे मार्गाची तातडीने निविदा काढून काम सुरू करावे, जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाची स्थापना करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी,कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्राकडून भरघोस निधीची तरतूद करावी व हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा अश्या महत्वाच्या समस्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मांडल्याच गुरव यांनी सांगितले.
याशिवाय नांदेड ते पनवेल एक्सप्रेसला ढोकी रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा करावा. लातूर – मुंबई रेल्वेला कळंब रोड रेल्वे स्थानकावर थांबा देऊन हजारो प्रवाशांची सोय करावी. हरंगुळ ते हडपसर रेल्वे सेवा पुणे रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारावी. धाराशिव जिल्ह्याच्या वाढत्या औद्योगिक, कृषी व नागरी वीज गरजा लक्षात घेऊन नवीन २०० केव्ही उपकेंद्रांची उभारणी करण्यात यावी. बार्शी टेक्स्टाईल मिल तातडीने पुन्हा सुरू करून तिचे आधुनिकीकरण करावे. या उद्योगाच्या पुनरुज्जीवनामुळे बार्शीसह संपूर्ण परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील अशी मागणी खासदार यांनी केली.
गुरव पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील ट्रिगर निकषांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे प्रत्यक्षात पीक नुकसान होऊनही अनेक शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत. शेतकरी नियमितपणे विमा हप्ता भरत असतानाही विद्यमान निकषांमुळे त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. केंद्र सरकारने ट्रिगर निकषांचा फेरविचार करून स्थानिक स्तरावरील प्रत्यक्ष पीक नुकसानी आधारे भरपाई देण्याची व्यवस्था करावी. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आवश्यक सुधारणा करून कोणताही पात्र शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची अत्यंत महत्वाची बाब अमीतजी यांच्याकडे मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न खासदार ओमराजे यांनी केला आहे.
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची असून त्यांची आवश्यकता
ओमराजे यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी सर्व विषय सकारात्मकपणे ऐकून संबंधित मंत्रालयांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. धाराशिवच्या विकासासाठी खासदार ओमराजे यांचा पाठपुरावा अविरत सुरू राहणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहील असे सोमनाथ गुरव यांनी सांगितले.
























