सोलापूर : अवंतीनगर पुल परिसरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याचे समोर आले असून, नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण आणि झाडी-झुडपांची सफाई प्रभावीपणे न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात परिसरातील विविध नगरांत पुन्हा पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेळगी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढून कारंबा नाका, जुना पुणा नाका ते सहा व १४ कमानीपर्यंत नाल्याला पूर आला होता. परिणामी मडकी वस्ती, गणेशनगर, वसंत विहार-३, आळळे नगर, आर्यनंदी नगर, यशनगर भाग-२ यांसह अनेक भागांमध्ये पाणी शिरले होते. रस्ते जलमय झाले होते, तर यशनगरातील काही घरांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
मागील वर्षीच्या या आपत्तीचा धडा महापालिका प्रशासनाने घेतलेला दिसत नसल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. यावर्षी मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अवंतीनगर पुल परिसरातील नालेसफाईची कामे अर्धवट असल्याचे चित्र आहे.
अवंती पुलाच्या उजव्या बाजूला अवंतीनगरच्या समांतर असलेल्या नाल्याची सफाई, खोलीकरण आणि रुंदीकरण तुलनेने व्यवस्थित करण्यात आले आहे. मात्र पुलाच्या डाव्या बाजूला स्पर्श हॉस्पिटललगतच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण आणि सफाई अपुरी राहिल्याचे दिसून येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढलेली असून, पुलाखाली केवळ सुमारे २५ टक्के जागेतूनच पाण्याचा प्रवाह होऊ शकतो. उर्वरित भाग विविध अडथळ्यांनी व्यापलेला असल्याने पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही.मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली काही प्रमाणात गाळ काढण्यात आला असला, तरी तो नाल्याच्या कडेलाच टाकून ठेवण्यात आला आहे. पावसामुळे हा गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची शक्यता असून, त्यामुळे नाल्याची वहनक्षमता कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे थातूरमातूर पद्धतीने झाल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
याशिवाय अवंतीनगर पुलालगतच्या छोट्या नाल्याची सफाई करण्यात आली असली, तरी परिसरातील झाडी-झुडपे अद्यापही हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संपूर्ण नाला परिसरातील स्वच्छता आणि अडथळे दूर करण्याची कामे अपूर्ण राहिल्याचे चित्र आहे.
नाल्यांची संपूर्ण सफाई, खोलीकरण,
रुंदीकरणाची आवश्यकता
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अवंतीनगर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांची संपूर्ण सफाई, खोलीकरण, रुंदीकरण तसेच झाडी-झुडपे हटविण्याची तातडीची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
——–
Post Views: 8