अक्कलकोट – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वाढती भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने मंदिर परिसरात ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हा आदेश काढण्यात आला असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातूनही दररोज हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होत असतात. गर्दीच्या काळात ड्रोनचा अनियंत्रित वापर झाल्यास गोंधळ निर्माण होण्याची, सुरक्षा व्यवस्थेवर ताण येण्याची तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत ड्रोन उड्डाण प्रतिबंधित करण्यात आले आहे.
प्रशासनाने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, दहशतवादी कारवाया, गैरप्रकार, चोरी, लूटमार तसेच अन्य अनधिकृत हालचाली रोखण्यासाठी ही बंदी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. मंदिर परिसरातील भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस व महसूल प्रशासन विशेष सतर्क राहणार आहे.
सदर आदेश ८ जूनपासून पुढील ६० दिवस लागू राहणार असून, या कालावधीत प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर आणि संबंधित भागात ड्रोन उडविता येणार नाही. भाविकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मगर यांनी केले आहे.
Post Views: 8