पुणे – घरातील ज्येष्ठ मंडळींची विशिष्ट वयानंतर आपण जी सेवा करतो, ती सेवा नसते, तर ते कर्तव्य असते. ‘कौशिक आश्रम’ हे देखील संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांची सेवा करणारे कर्तव्यपूर्तीचे केंद्र आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांनी शनिवारी केले.
पुण्यातील मित्रमंडळ सोसायटीमध्ये असलेल्या ‘कौशिक आश्रम’ या वास्तूच्या पुनर्निर्माणानिमित्त आयोजित ‘कृतज्ञता सत्कार कार्यक्रमा’त श्री. जोशी बोलत होते. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. नानासाहेब जाधव आणि संस्थेचे विश्वस्त दिवाकर पांडे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
‘कौशिक आश्रम’पुनर्निर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिलेल्या हितचिंतकांचा प्रातिनिधिक सत्कार जोशी, प्रा. जाधव आणि पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
‘कौशिक आश्रम’ हे विश्रांतीस्थान नाही तसेच ते सेवाकेंद्रही नाही. समाधान आत्मीयतेमध्ये असते. असे आत्मीयतेचे, समाधानाचे, आनंदाचे वातावरण ज्या वयात अनुभवायला मिळाले पाहिजे, असे ज्येष्ठ कार्यकर्ते ‘कौशिक आश्रम’ येथे राहणार आहेत. त्यांना येथे तसेच वातावरण अनुभवता येईल, असे जोशी यांनी सांगितले.
या इमारतीला ऑफिसचे स्वरूप येणार नाही. हे घर आहे, असे वातावरण जिथे अनुभवायला मिळेल, अशी ही वास्तू आहे. पुढेही येथे समाधानाचे वातावरण राहील याची खात्री देतो, असेही भय्याजी जोशी म्हणाले. डॉ. जगदीश करमळकर यांनी मनोगत व्यक्त केले. नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
*चौकटीसाठी मजकूर*
*मैत्रीचा संदेश देणारे केंद्र*
कार्यक्रमापूर्वी मित्रमंडळ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर भय्याजी जोशी यांनी संवाद साधला. ‘कौशिक आश्रम’ आमच्या सोयायटीमध्ये असल्याचा आम्हालाही आनंद आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हा धागा पकडून भय्याजी जोशी म्हणाले की, कायम मैत्रीचा संदेश देणारे ‘कौशिक आश्रम’ हे केंद्र आहे आणि हाच संदेश हे केंद्र पुढेही देत राहील.
Post Views: 5