सोलापूर – मंगळवेढा येथील नामांकित ‘दैनिक दामाजी एक्सप्रेस’ या वृत्तपत्राच्या वतीने दिला जाणारा मानाचा जिल्हास्तरीय ‘सोलापूर भूषण जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि माजी मुख्याध्यापक पद्माकर कुलकर्णी यांना अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक आणि नाट्य अशा बहुविध क्षेत्रांत त्यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याची दखल घेऊन या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पद्माकर कुलकर्णी यांचे कार्य केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून, त्यांनी सोलापूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. साहित्यिक योगदान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) माध्यमातून त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठे कार्य केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून ते ‘मसाप’च्या पुणे मध्यवर्ती कार्यकारिणीवर सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. नुकतीच त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे, ही त्यांच्या लोकप्रियतेची पावती आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे, ह भ प सुधाकर महाराज इंगळे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहकुलासचिव डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. प्रकाश जडे, मंगेश चिवटे, सेवासदन प्रशालेच्या पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सन्मानाबद्दल बोलताना पद्माकर कुलकर्णी म्हणाले की, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सोलापूरच्या रसिक जनतेचा आणि ज्या संस्थांमध्ये मी काम केले, त्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. या गौरवामुळे समाजकार्याची जबाबदारी आणखी वाढली आहे.”
कुलकर्णी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूरचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार, मसापच्या प्रा.श्रुती वडगबाळकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर, कल्याण शिंदे, लहू ढगे, यतीराज वाकळे, मंगळवेढा नाट्य परिषदेचे अध्यक्ष तेजस्विनी कदम आदींनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.


























