जालना – शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावतांनाचं सामान्य जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांनी नवीन दालनाच्या माध्यमातून प्रयत्न करावा,अशी अपेक्षा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी येथे बोलतांना व्यक्त केली.
जालना मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्या महानगर पालिकेतील दालनाचा शुभारंभ माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कैलाश गोरंट्याल,महानगर अध्यक्ष भास्कर दानवे, माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका संगीताताई गोरंट्याल,महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राउत, अक्षय गोरंटयाल, सभापती मायाताई जोशी, विजय पांगारकर, अनामिका पांगारकर, सौ. पानबिसरे, शशिकांत घुगे, बद्रीनाथ पठाड़े, जीवन सले, रमेश गौरक्षक, अशोक पवार, महावीर ढक्का, शिवराज जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना माजी आमदार कैलास गोरंटयाल म्हणाले की, शहरातील जनतेने प्रथमच झालेल्या जालना मनपाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत देत मनपाची सत्ता भाजपकडे सोपवली. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत शहराचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि सर्व सभापती, नगरसेवकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. यावेळी भास्कर दानवे यांनीही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन त्या दृष्टीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून जालना मनपाचे उत्पन्न वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी प्रयत्न सुरू असून आगामी काळात मनपाचे उत्पन्न किमान १०० कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करून सर्वांना सोबत घेऊन जानेवारी २०२७ पर्यंत शहरातील जनतेला तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यासह स्वच्छ,सुंदर आणि हरित जालना करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सभापती अशोक पांगारकर यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमास अन्य नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.




















