बार्शी – येथील स्वर संध्या ग्रुपच्यावतीने आया सावन झुमके हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन संगीत क्षेत्रातील प्रख्यात गायिका उमा सामनगावकर, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार राजा माने यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप सोपल, रावसाहेब मनगिरे, संगीत शिक्षक प्रसाद सहस्रबुद्धे, ज्येष्ठ तबला वादक तुषार गदगी, श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या प्राचार्या दिपाली सहस्रबुध्दे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत संगीतमय अशा वातावरणात स्वरसंध्या ग्रुपचे डॉ. मदन देगावकर, सूर्यकांत वायकर, मधुसूदन चांडक, डॉ. तेजस्वी गपाट, रुपाली शिंदे, गिरीजा पोळ या कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचे सुरेल आणि भावस्पर्शी सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी श्रोत्यांनीही काही निवडक गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत वन्स मोअरची मागणी करत गीतांचे पुन्हा सादरीकरण करायला लावले.
या भाव मधूर अशा कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि निवेदन मंजुषा राऊत व माधुरी शिंदे यांनी केले.
तसेच ऑगस्ट क्रांती दिनाच्यानिमित्ताने ‘दिल दिया है जान भी देंगे’ या कर्मा चित्रपटातील गाण्याने स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व वातावरण देश भक्तीने फुलून गेले होते.