सांगोला – सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून आरोग्य विभागातील रिक्त पदे भरतीसाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार करून तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नंदकिशोर घाडगे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत डॉ.संतोष नवले यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य योजनांची तसेच सन २०२५-२६ मधील आरोग्य योजनांबाबतची आर्थिक व भौतिक आकडेवारी सादर केली. ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवून परिसर निर्जंतुक ठेवण्यावर भर देण्यात यावा. आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देऊन स्थानिक रुग्णांना किरकोळ आजारांवर जागीच उपचार देण्यासाठी सक्षम केले जाईल. यासाठी त्यांना वैद्यकीय किट वाटप करणे व कायम औषध पुरवठ्यासाठी सेस फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी रुग्णालयांवरील विश्वास वाढवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात असे निर्देश देण्यात आले असल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या ‘आभा’ कार्ड योजनेला गती देण्यासाठी आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि इतर विभागांमध्ये समन्वय वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक गरजा लक्षात घेता नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांशी बोलताना सौजन्य, नमता आणि तत्परता ठेवून त्यांना दर्जेदार सेवा देण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही.
– चेतनसिंह केदार सावंत, शिक्षण व आरोग्य सभापती























