सोलापूर – “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. विज्ञानाच्या प्रगतीची जोड देत आपण निरोगी भविष्य घडवू शकतो. मात्र ‘एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी’ याघोषवाक्याची अंमलबजावणी प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरू करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोलापूर जिल्हा रुग्णालयात विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, दंत वैद्यकीय अधिकारी डॉ. वायचळ, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, डॉ. काशेट्टी मीना, डॉ. दळवी डॉ. ऐश्वर्या सातपुते एन.सी.डी समन्वयक), डॉ. पल्लवी अंबुरे, डॉ. सुवर्णा राठोड, डॉ. पूजा राठोड, शोभा माने यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ जगभर साजरा केला जातो. या वर्षीच्या घोषवाक्याच्या अनुषंगाने विविध आरोग्य सेवा, तपासणी शिबिरे आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिली. यावेळी त्यांनी सर्वांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश
पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने विशेष लक्ष वेधले. तंबाखू, धूम्रपान आणि इतर व्यसनांच्या दुष्परिणामांवर आधारित या सादरीकरणातून उपस्थितांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात आली.आरोग्यदायी समाजासाठी वैयक्तिक जबाबदारी आणि विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.






















