सोलापूर – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहरात क्रीडा क्षेत्रातील उत्साहाचे दर्शन घडले. क्रीडा भारती आणि विनर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी सोलापूर ते तुळजापूर अशा भव्य स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या मंगलमयी वातावरणात निघालेल्या या रॅलीने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
शुक्रवारी पहाटे ५:०० वाजता सोलापुरातील ग्रामदैवत रूपाभवानी मंदिर येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री ज्ञानेश्वर म्याकल यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून खेळाडूंना मार्गस्थ करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या साहसी रॅलीमध्ये लहान मुलांपासून ते अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांचा मोठा सहभाग होता. क्रीडा भारती सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अरुण उपाध्ये व प्रशिक्षक वासुदेव कैरमकोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली. या रॅलीमध्ये भारत बंडा, प्रशांत बामनला, श्रीलेखा बामनला, समयुक्ता गुंडेली, प्राची गुंडेली, नवशिल जक्का, साईकृष्णा जक्का, श्लोक रंगडाळ, सुमीत दासरी, सौम्या दासरी, श्रद्धा फालमारी, प्रणव गोली, कृषीका गोली या खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला. तसेच मनोहर गुंडेली, हरीश रंगडाळ, बसवराज बंडा, श्रीनिवास बामनला, प्रभाकर फलमारी, नवनीत जक्का, प्रीती रंगडाळ, स्वाती जक्का आदी मान्यवर आणि पालकांनी रॅली सोबत राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला.
क्रीडा संस्कृतीचे संवर्धन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तरुणांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी आणि साहसी खेळांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर ते तुळजापूर हे अंतर स्केटिंग करत पार पाडणाऱ्या या खेळाडूंचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

























