नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून कोयी संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष वाहनात 12 हजाराहून अधिक कोयी जमा झालेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने आंब्याच्या सुकलेल्या कोयी जमा करण्याचे आवाहन केल्यापासून हा अत्यंत आगळावेगळा उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून विविध माध्यमांतून प्राप्त झाल्या असून विशेष वाहनात कोयी जमा करण्यातही नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे.
अशाच प्रकारचा ‘गुठली रिटर्न्स’ हा उपक्रम ‘रेड एफएम’ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर राबविला जात असून त्यांच्याकडे संकलित होणा-या कोयी ते शेतक-यांपर्यंत आंबा रोप लागवडीसाठी पोहचवून त्यांना उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणावर कोयी संकलित होणार असल्याने त्यामधील कोयीतून तयार होणारी काही वृक्षरोपे नवी मुंबईच्या आम्रवृक्ष संवर्धनासाठी ठेवून उर्वरित साधारणत: 1 लाख संकलित कोयी रेड एफएमच्या ‘गुठली रिर्टन्स’ या पर्यावरण संवर्धक उपक्रमासाठी दिल्या जाणार आहेत.
आजच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रेड – एफएम वाहिनीवरून गुठली रिटर्न उपक्रमाबाबत आरजे मलिष्का यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी केलेल्या संवादाचे थेट प्रसारण रेड – एफएम वाहिनीव्दारे करण्यात आले आहे. या उपक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवून सहकार्याची भूमिका ठेवल्याबद्दल रेड एफएम वाहिनीव्दारे स्वागत करण्यात आले आहे तसेच रेड – एफएम वाहिनीच्या श्रोत्यांनीही प्रशंसा केली आहे.
नवी मुंबईतील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स अशा ठिकाणांहून या आंब्याच्या कोयी संकलित करण्यासाठी दोन परिमंडळांसाठी स्वतंत्र वाहन तयार करण्यात आले असून कोयी संकलन मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम पुढील काही दिवस असाच सुरू राहणार आहे.
तरी नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर कोयी ओल्या कच-यात न टाकता एखाद्या भांड्यात स्वच्छ धुवून घ्याव्यात व उन्हात सुकवाव्यात आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनात वर्तमानपत्रे अथवा बॉक्समध्ये पॅक करून द्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.