सोलापूर : प्रसंगावधान आणि माणुसकी जिवंत असेल, तर कठीण प्रसंगातही मार्ग सापडतो, याचाच प्रत्यय आज सोलापुरात पाहायला मिळाला. NEET UG परीक्षेसाठी चुकीच्या केंद्रावर पोहोचलेल्या एका विद्यार्थिनीला अवघ्या ५ मिनिटांत योग्य केंद्रावर पोहोचवून, कार चालक विरेश कंदगुळे यांनी तिचे वर्ष वाया जाण्यापासून वाचवले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
रविवार, ३ मे २०२६ रोजी NEET UG परीक्षा होती. सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील ‘एस व्ही सी एस’ शाळा येथे एका विद्यार्थिनीला तिच्या आईने परीक्षा केंद्रावर सोडले. आत गेल्यावर शिक्षकांनी कागदपत्रे तपासली असता, तिचे परीक्षा केंद्र हे अक्कलकोट रोड एस व्ही सी एस नसून भवानी पेठ ‘एस व्ही सी एस’ असल्याचे समोर आले.
या गोंधळात वेळ दुपारी १:२२ ची झाली होती. केंद्राचे गेट दुपारी १:३० वाजता बंद होणार होते. हाती फक्त ८ मिनिटे होती. आईला फोन लावला असता तो लागला नाही, ज्यामुळे विद्यार्थिनी घाबरून रडायला लागली.
विद्यार्थिनीचे रडणे पाहून तेथील शिक्षकांनी केंद्राबाहेरील पालकांना मदतीचे आवाहन केले. त्यावेळी तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष आणि डॉ. अरुंधती हराळकर यांच्या मुलाला परीक्षेसाठी सोडण्यासाठी आलेले मिताली ट्रॅव्हल्सचे चालक विरेश कंदगुळे हे तातडीने पुढे आले.
वेळेचे गांभीर्य ओळखून १:२४ वाजता त्यांनी विद्यार्थिनीला कारमध्ये बसवले. अक्कलकोट रोड ते भवानी पेठ हे अंतर कापण्यासाठी त्यांच्याकडे खूपच कमी वेळ होता. जर १:३० च्या आत ती पोहोचली नसती, तर तिचे वर्षभराचे कष्ट वाया गेले असते.
कोणताही विलंब न लावता, विरेश कंदगुळे यांनी शिताफीने गाडी चालवत अवघ्या ५ मिनिटांत म्हणजेच १:२९ वाजता भवानी पेठ येथील परीक्षा केंद्र गाठले. अवघ्या एक मिनिटाचा अवधी शिल्लक असताना ती विद्यार्थिनी केंद्रात प्रवेश करू शकली.
ओळखीचा संबंध नसताना केवळ एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उदात्त भावनेतून विरेश कंदगुळे यांनी केलेल्या या मदतीमुळे सोलापूरच्या ‘स्मार्ट’ माणुसकीचे दर्शन घडले आहे. शिक्षकांनी आणि पालकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

























