सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बाळे येथील नोवेल नेक्सस लायब्ररीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या हस्ते झाले.
लायब्ररीचे प्रमुख प्रा. वृषसेन धनके यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. हेडगेवार ब्लड बँक यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात एकूण ३३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
या उपक्रमात ह.दे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, प्रा. वृषसेन धनके, ह.दे. कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब सदाफुले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जाती-धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतातील नागरिकांचे दैवत आहेत. त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय दिला, असे सांगितले. प्रा. धनके हे महापुरुषांच्या विचारांवर चालत समाजाभिमुख उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत, असेही सांगून त्यांनी रक्तदाते व आयोजकांचे आभार मानले.



























